जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. त्यानिमित्ताने जोधपूरला आलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत येथील विमानतळावर एका व्यक्तीने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, तिच्या सुरक्षा रक्षकांनी तिला घेराव घातला आणि त्या व्यक्तीला तात्काळ तेथून हाकलले.19 वर्षांपूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी उद्या होणार आहे. या सुनावणीसाठी अभिनेत्री तब्बू मुंबईवरून जोधपूरला पोहोचली. यावेळी तिच्यासोबत तिचे सुरक्षा रक्षकही होते. अभिनेत्री तब्बू विमानतळावरून बाहेर पडत असताना एक व्यक्ती तिच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात घुसला. त्यानंतर त्याने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तब्बू संतापल्याने तिच्या सुरक्षा रक्षकांनी त्या बाजूला हाकलून दिले. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबद्दल तिने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटची शिकार केल्याचा आरोप अभिनेता सलमान खान याच्यावर करण्यात आला आहे. त्यावेळी सलमानसोबत अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि सैफ अली खान उपस्थित होते. त्यामुळे या कलाकारांवर सुद्धा आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याप्रकरणी आणि अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे उद्या(दि.5) रोजी याप्रकरणावर जोधपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Blackbuck poaching verdict: जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 9:55 PM