नवी दिल्ली: फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडून ब्लॅकलिस्ट होण्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे २० तळ बंद करण्यात आले आहेत. जानेवारीपासून पाकिस्ताननंदहशतवाद्यांचे तळ बंद करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात घुसखोरीचे फारसे प्रकार घडले नसल्याची माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्यानं 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिली आहे. दहशतवाद्यांच्या तळांवरुन काश्मीरमध्ये घुसखोरी केली जाते. मात्र या वर्षात आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे २० तळ बंद करण्यात आले आहेत. जून महिन्यात फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सची (एफएटीएफ) बैठक झाली. त्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावरुन ब्लॅकलिस्ट केली जाऊ नये यासाठी पाकिस्ताननं हे पाऊल उचललं. एफएटीएफची पुढील बैठक ऑक्टोबरमध्ये होणार आहे. पॅरिसमध्ये होणाऱ्या या बैठकीत पाकिस्तानला मनी लॉण्ड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या मुद्द्यावरुन ब्लॅकलिस्ट करायचं का, याबद्दलचा निर्णय होईल. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांची संख्या कमी झाल्यानं नियंत्रण रेषेवरील कुरापती कमी झाल्या आहेत. सीमारेषेवरुन होणाऱ्या घुसखोरीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं सूत्रांनी सांगितली. तब्बल तीन दशकांनंतर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर इतकी शांतता पाहायला मिळत असल्याचंदेखील सूत्रांनी सांगितलं. नियंत्रण रेषेसोबतच काश्मीरमधील परिस्थितीतही मोठी सुधारणा झाली आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवाया नियंत्रणात आल्या आहेत.
ब्लॅकलिस्टची भीती; पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे २० तळ बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:51 PM