चेन्नई : आजचा दिवस (गुरुवार) देशासाठी दुर्घटनांचाच दिवस ठरला. विशाखापट्टनम आणि रायगड येथील दुर्दैवी घटनांनंतर, आता तामिलनाडूच्या नेवेली येथे बॉयलर फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेत सात जण जखमी झाल्याचे समजते. राज्यातील कुड्डालोर जिल्ह्यातील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्लांटमध्ये ही घटना घडली.
घटनेनंतर प्लांटमधून धुराचे लोळ निघताना दिसले. घटना घडताच एनएलसी इंडिया लिमिटेडचे मदत आणि बचाव कार्य करणारे चमू घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.
आणखी वाचा - Vizag Gas Leak : मृतांच्या कुटुंबीयास १ कोटी तर गंभीर जखमींना १० लाखांची मदत
मोठ्या स्फोटानंतर लागली आग -स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. एका मोठ्या स्पोटानंतर लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर प्लांटमध्ये सुरू असलेली कामे थांबवण्यात आली आहे.
यापूर्वी आजच झाल्या दोन भयंकर घटना -यापूर्वी आज (गुरुवार) सकाळी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनमजवळ एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये गॅस गळतीची भयानक घटना घडली. यात 11 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास एक हजार लोक गंभीर आहेत. यानंतर छत्तीसगडच्या रायगडमध्ये एका पेपर मिलमध्ये गॅस लीक झाल्याने मजुरांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी तीन जण गंभीर आहे.
आणखी वाचा - विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडच्या पेपर मिलमध्ये गॅस गळती