२ ठार : मृत महिला मानवी बॉम्ब असण्याची शक्यता; दोन कैदी फरारआरा/ पाटणा : बिहारमध्ये पाटण्यापासून ६० किमी अंतरावरील आरा दिवाणी न्यायालय परिसरात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस कॉन्स्टेबल आणि महिला ठार झाली तर वकिलांसह १६ जण जखमी झाले. मृत महिला मानवी बॉम्ब असावी असा पोलिसांना संशय आहे.अतिरिक्त पोलीस महासंचालक (मुख्यालय) गुप्तेश्वर पांडेय यांनी पाटण्यात सांगितले की, सकाळी ११.३० च्या सुमारास स्थानिक कारागृहातून काही कच्च्या कैद्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन येणारी व्हॅन न्यायालय परिसरात पोहचली त्यावेळी हा स्फोट झाला. स्फोटके आणणारी महिला ३५ ते ४० वर्षे वयोगटातील होती आणि ती मानवी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. तिच्या शरीरावर आणि मोबाईलवर बॉम्बचे तुकडे सापडले आहेत. परंतु हा बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता पांडेय यांनी फेटाळून लावली. स्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव अमितकुमार (वय ४०) आहे. जखमींमध्ये तीन वकील आणि काही पोलिसांसह १६ जणांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)४प्रथमदर्शनी हा स्फोट कच्च्या कैद्यांना पळून जाण्यास मदत करण्यासाठी घडविण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे बिहारचे मुख्य सचिव अंजनीकुमार सिंग यांनी सांगितले. दोन कैदी परिस्थितीचा फायदा घेत पळून गेले असून यापैकी एकाचे नाव लंबु शर्मा आहे. त्याने यापूर्वीसुद्धा २००९ साली आरा न्यायालय परिसरात आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्फोट घडवून पळण्याचा प्रयत्न केला होता.