नवी दिल्ली - बिहारच्या भागलपूर परिसर गुरुवारी रात्री स्फोटांनी हादरला आहे. भागलपूरमध्ये झालेल्या स्फोटात परिसरात मोठे नुकसान झाले आहे. यामध्य़े 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घरांची राखरांगोळी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यातील तातारपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात हा भीषण स्फोट झाला आहे. एका तीन मजली इमारतीत हा स्फोट झाला असून या स्फोटात इमारत कोसळली आहे.
इमारतीच्या आजूबाजूच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. फटाके आणि गावठी बॉम्ब यामुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी जेबीसीच्या मदतीने वेगाने काम सुरू आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या लोकांना भागलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरात स्फोट झाला तिथे बॉम्ब बनवण्याचा व्यवसाय सुरू होता. तसेच स्फोटांचे आवाज ऐकून काही क्षणांसाठी नागरिकांना भूकंप झाला असं वाटलं. गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. शिवाय, या फटाके तयार करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र नेमकी माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.