नवी दिल्ली - आंध्र प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. केमिकल फॅक्ट्रीमध्ये स्फोट झाला आहे. या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इलुरू जिल्ह्यातील रेड्डीगुडेममध्ये ही दुर्घटना घडली. मुस्नूर जोनमधील पोरस लॅबमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटानंतर आग लागली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. दुर्घटना घडली त्यावेळी लॅबोरेटरीच्या या ब्लॉकमध्ये 30 लोक काम करत होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
बुधवारी रात्री जवळपास 11.30 च्या सुमारास ही भीषण घटना घडली. प्लान्टमधील गॅस लीक झाल्यानंतर हा स्फोट झाला आणि त्यानंतर प्लान्ट युनिटला आग लागली. जखमींना उपचारासाठी तातडीने नुज्विडच्या GMH रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
एसपी राहुल देव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटना नेमकी का घडली यामागचं कारण शोधलं जात आहे. रिएक्टरमध्ये स्फोट झाला की शॉर्ट सर्किट याचा अधिकारी तपास करत आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख, गंभीर जखमींना 5 लाख आणि जखमींना 2 लाख मदत देण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांना योग्य तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.