श्रीनगर - जम्मू बस स्टँडवर गुरुवारी (7 मार्च) ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये जवळपास 28 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून परिसर रिकामा करण्यात आला आहे.
गुरुवारी जम्मूमधील बस स्टँडवरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 28 जण जखमी झाले आहेत. जम्मूचे आयजीपी एम. के. सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ला होईल अशी शक्यता होती आणि पोलीस त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करत होते. मात्र कोणतीही ठराविक माहिती देण्यात आलेली नव्हती. याआधीही दहशतवाद्यांनी अनेकदा बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही ग्रेनेड हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
Jammu And Kashmir : हंदवाडा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (7 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (5 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच याआधी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान रविवारी (3 मार्च) दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले होते.