नवी दिल्ली- देशाचा जीडीपी सातत्याने घसरतो आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीची घसरण होत असताना सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, अशी टीका भाजपा नेते यशवंत सिन्हा केली आहे. नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयवार टीका करून यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावेळी यशवंत सिन्हा यांनी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला चौपट करण्याचं काम केलं आहे. यामुद्द्यावर मी बोलायचा ऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल, असं म्हणत सिन्हा यांनी अरूण जेटलींवर टीका केली आहे. पक्षाविरोधात बोलण्याची हिंमत न करणारे लोक माझ्या या वक्तव्याने दुखावले जातील याची कल्पना असल्याचंही सिन्हा म्हणाले आहेत. अरुण जेटली या सरकारमधील सक्षम मंत्री असल्याचं समजलं जातं. २०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये अरुण जेटलींनाच अर्थमंत्रिपद दिलं जाईल, असे बोललं जात होतं. त्यांची पात्रता पाहता त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थ मंत्रालय, संरक्षण आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली होती, असंही ते म्हणाले. अर्थ मंत्रालयाचे काम किती कठिण आहे याची मलाही जाणीव आहे. २४ तास काम करावं लागतं. याचाच अर्थ सुपरमॅन अरुण जेटलींनाही हे काम कठिण वाटलं असेल, असं सिन्हा म्हणाले आहेत.
कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती आणि बँकांच्या वाढत्या एनपीएवर यशवंत सिन्हा यांनी चिंता व्यक्त केली आहे. या समस्यांना चांगल्या पद्धतीने हाताळता आल्या असत्या, असंही सिन्हा म्हणाले. खासगी गुंतवणुकीत घट झाली आहे. गेल्या दोन दशकांत इतकी कमी गुंतवणूक कधीच झाली नव्हती. औद्योगिक उत्पादनही खूपच घसरलं आहे. कृषी क्षेत्र संकटात आहे तसंच उत्पादन, रोजगार, सेवा ही क्षेत्रंही संकटात आहेत. निर्यात ठप्प झाली आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांची हीच परिस्थिती आहे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे यशवंत सिन्हा यांनी लक्ष वेधलं आहे.
नोटाबंदीचा निर्णय हे तर आर्थिक संकट असल्याचं सिद्ध झालं आहे. सरकारकडून नोटाबंदीचा निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक उद्योग बंद पडले. रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आर्थिक विकास दरात त्यामुळे सातत्याने घट होते आहे. जीडीपी 5.7 टक्क्यांवर आला. नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असं सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितलं जातं. नोटाबंदीने तर या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे, अशी थेट टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.