ऑनलाइन लोकमत
मुगलसराय, दि. २६ - पाटणा रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय वापरुन पाहिल्या जाणा-या पॉर्न साईटस रेल्वेने सोमवारी ब्लॉक केल्या. रेल टेलने नुकत्याचा केलेल्या सर्वेक्षणात पाटणा रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय सुविधेचा सर्वाधिक वापर पॉर्न साईटस पाहण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले होते.
पाटणा जंक्शनमध्ये पाहिल्या जाणा-या पॉर्न साईटस बंद करण्याची प्रक्रिया रेल टेलने सुरु केली आहे. पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणा-या सर्व महत्वाच्या स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा ट्रेनची माहिती जाणून घेण्यासाठी दिली आहे. दुर्देवाने या सुविधेचा वापर दुस-या कारणांसाठी केला जात आहे असे पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ अरविंद राजक यांनी सांगितले.
पाटणा जंक्शनमध्ये इंटरनेटवरुन पॉर्न साईटसवरील व्हिडीओ डाऊनलोड केले जात होते. हाजीपूर, मुघलसराय, या स्थानकातही मोफत वाय-फायची सुविधा असून तिथेही या साईटस बंद केल्या जाणार आहेत. गया रेल्वे स्थानकातही मोफत वाय-फायची सुविधा लवकरच सुरु होईल तिथे अशा कामांसाठी वाय-फायचा वापर होणार नाही याची काळजी घेऊ असे राजक यांनी सांगितले.