Congress Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेला मोठा धक्का बसला आहे. कारण बंगळुरूच्या कोर्टानं काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. KGF-2 चित्रपटातील गाणं आपल्या व्हिडिओसाठी बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोप काँग्रेसवर करण्यात आला आहे.
कोर्टानं आपल्या आदेशात ट्विटर इंडियाला स्पष्ट शब्दांत सांगितलं की काँग्रेसकडून करण्यात आलेले ते तीन ट्विट तातडीनं डिलीट करण्यात यावेत ज्यात KGF-2 चित्रपटातील गाण्याचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच काँग्रेस (@INCIndia) आणि भारत जोडो (@BharatJodo) हे दोन ट्विटर हँडल पुढील सुनावणीपर्यंत ब्लॉक केले जावेत, असे आदेश कोर्टानं दिले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. याच यात्रेशी निगडीत तीन व्हिडिओंना सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमा केजीएफ-२ मधील गाणं वापरण्यात आलं आहे. याच व्हिडिओंवर आक्षेप घेण्यात आला आहे. एमआरटी म्युझिक कंपनीचे मॅनेजर एम.नवीन कुमार यांनी बंगळरूच्या यशवंतपूर ठाण्यात याविरोधात तक्रार नोंदवली होती. KGF-2 चित्रपटातील गाण्याचे सर्वाधिकार एमआरटी म्युझिक कंपनीकडे आहेत. एफआयआरमध्ये राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांची नावं नमूद करण्यात आली आहेत.
हे आहेत ते काँग्रेसचे ट्विट्स...
कोर्ट काय म्हणालं?बंगळुरूच्या सिवील कोर्टानं पुढील आदेशापर्यंत काँग्रेस आणि भारत जोडो यात्राच्या ट्विटर हँडलला ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रकरण कॉपीराइट नियमांचं उल्लंघन करणारं असल्याचं कोर्टानं मान्य केलं आहे. तसंच या व्हिडिओंमुळे सिनेमेटोग्राफी, सिनेमे, गाणी आणि म्युझिक अल्बमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तसंच यामुळे मोठ्या प्रमाणात पायरसीला देखील खतपाणी मिळू शकतं, असंही कोर्टानं म्हटलं आहे. कोर्टानं या प्रकरणाचे तांत्रिक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी लोकल कमिश्नरची नियुक्ती केली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
काँग्रेसचं म्हणणं काय?काँग्रेसनं या प्रकरणाबाबत कायदेशीरबाजू तपासली जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच या प्रकरणाच्या सुनावणीवेळी काँग्रेसच्या बाजूनं कोर्टात कुणीही उपस्थित नव्हतं, असंही पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. "बंगळुरूच्या कोर्टानं जो निकाल दिला आहे त्याची माहिती पक्षापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचली आहे. आतापर्यंत पक्षाला कोणतीही अधिकृत ऑर्डर कॉपी प्राप्त झालेली नाही", असं काँग्रेसनं ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पक्षातील कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नाही. तसंच कोर्टात सुनावणीवेळीही पक्षाकडून कुणीही उपस्थित नव्हतं, असाही दावा काँग्रेसनं केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"