जबरदस्त राजकारण! भाजप, काँग्रेसचं तिकीट मिळवत बिनविरोध निवडून आला उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 06:18 PM2021-07-10T18:18:58+5:302021-07-10T18:21:44+5:30
तीन बड्या पक्षांकडून उमेदवारी मिळवत नेता बिनविरोध विजयी
प्रयागराज: उत्तर प्रदेशात सध्या ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या लढवत आहेत. मोठ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू आहे. काही उमेदवारांना पाठिंबाच न मिळाल्यानं त्यांना घरी बसावं लागलं. तर काहींनी इतरांचं गणित बिघडवण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवली.
प्रयागराजमधल्या एका नेत्याच्या बाबतीत मात्र अगदी उलटं झालं आहे. शैलेश यादव यांना एक दोन नव्हे, तर तीन-तीन मोठ्या पक्षांनी उमेदवारी दिली. त्यामुळे यादव बिनविरोध निवडून आले. आता तिन्ही पक्ष शैलेश यादव त्यांचेच उमेदवार असल्याचा दावा करत आहेत. विजयी उमेदवारांच्या यादीत शैलेश यांचं नाव असल्याचं म्हणत भारतीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं आपला उमेदवार विजयी झाल्याचं म्हणत जल्लोष करत आहेत.
प्रतापपूर मतदारसंघात जबरदस्त राजकारण
प्रतापपूर मतदासंघात शैलेश यादव बिनविरोध निवडून आले. यादव समाजवादी पक्षाचे नेते म्हणून परिसरात परिचित आहेत. बऱ्याच वर्षांपासून ते सपामध्ये सक्रिय आहेत. सपा जिल्हाध्यक्ष योगेश यादव यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी उमेदवारांची घोषणा केली. त्यात सातव्या क्रमांकावर शैलेश यादव यांचं नाव होतं. त्यामुळे प्रतापपूर ब्लॉकमधून शैलेश यादव सपाचे अधिकृत उमेदवार होते.
आठ जुलैला सकाळी काँग्रेसनंदेखील शैलेश त्यांचे उमेदवार असल्याची घोषणा केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी त्यांच्या लेटरहेडच्या माध्यमातून याबद्दल घोषणा केली. सपानं त्यानंतर या जागेवर राधादेवींनी उमेदवारी दिली. तर ७ जुलैला भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. प्रतापपूर ब्लॉकमधून भाजपनं सीमादेवी विश्वकर्मा यांना उमेदवारी दिली. ८ जुलैला भाजप जिल्हाध्यक्ष अश्विनी कुमार द्विवेदी यांनी सीमा यांचं तिकीट कापलं आणि शैलेश यादव यांना उमेदवारी दिली.
९ जुलैला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती. तिन्ही बड्या पक्षांनी उमेदवारी दिल्यानं यादव बिनविरोध निवडून आले. आता तिन्ही पक्ष विजयी उमेदवारांच्या यादीचा हवाला देत आपलाच विजय झाल्याचा दावा करत आहेत. निवडणुकीच्या राजकारणात बाजी मारत शैलेश यादव बाजीगर ठरले. तर त्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षांवर आता डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे.