नवी दिल्ली : धार्मिक असहिष्णुता निर्माण करण्यासाठी अतिरेकी समूहांकडून इंटरनेटचा वापर वाढत असतानाच, सरकारने अल्पसंख्याक समुदायास चिथावणी देणारी वा धार्मिक तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक सामग्री असलेली सुमारे ४० वेबपेज ‘ब्लॉक’ करण्याचा आदेश दिला आहे.या आदेशामुळे सोशल मीडिया तसेच व्हिडीओ शेअरिंग संकेतस्थळांवरही ‘संक्रांत’ येणार आहे. अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २००९च्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अल्पसंख्याक समुदायास चिथावणी देणारे व्हिडीओ ब्लॉक करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. २९ जूनच्या या आदेशानुसार, बहुतांश इंटरनेट कंपन्यांनी असे व्हिडीओ ब्लॉक केले आहेत. काही व्हिडीओ अद्यापही दिसत असून, ‘सिक्युअर इंटरनेट प्रोटोकॉल’वरून अपलोड केल्याने ते ब्लॉक करता येत नसल्याचे इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी म्हटले आहे. इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही सर्व व्हिडीओ व संकेतस्थळे ब्लॉक करू शकत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
धार्मिक तेढ वाढविणारी संकेतस्थळे ब्लॉक
By admin | Published: July 27, 2015 1:32 AM