बंगळुरु, दि. 6 - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेक-यांना पकडण्याचं मोठं आव्हान कर्नाटक पोलिसांसमोर आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पोलीस आयुक्त टी सुनील कुमार यांनी सर्व डीसीपींना शहरात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला आहे. सावधगिरी म्हणून सर्व महत्वाच्या रस्त्यांवर चेकपोस्ट उभ्या करण्यात आल्या आहेत. शहरात प्रवेश करणा-या सर्व टोलनाक्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून शहरात येणा-या आणि शहरातून जाणा-या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
'मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिलेल्या आदेशानंतर तपासासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व चेकपोस्टवर लोक आणि वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. आंतरराज्यीय सीमांवरही आमचं लक्ष आहे', अशी माहिती पोलीस उपायुक्त एम एन अनुचेत यांनी दिली आहे. 'आम्ही शेजारी राज्य आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूलाही यासंबंधी अलर्ट दिला आहे', असं एम एन अनुचेत यांनी सांगितलं आहे.
पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला असल्याचीही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी जवळपास 33 ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असून एका सीसीटीव्हीत एक व्यक्ती कैद झाली असून त्याच्यावर पोलिसांना संशय आहे. या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, तसंच अंगावर काळे कपडे होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी परिसरातील मोबाईल टॉवरचीही तपासणी सुरु केली. तीन मोबाईल टॉवरची तपासणी सुरु असून त्यांचा डाटा गोळा केला जात आहे.
मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या.
केंद्रीय मंत्री स्मतृी इराणी यांनी हत्येचा निषेध करत लवकरात लवकर तपास करण्याची विनंती केली आहे.
55 वर्षीय गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
गौरी यांच्याविरोधात गतवर्षी मानहानीच्या दोन केसही दाखल करण्यात आल्या होत्या. धारवाडमधील भाजपा खासदार प्रल्हाद जोशी आणि भाजप नेते उमेश दोषी यांनी गौरी लंकेश यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आरोप केला होता. 2008 मध्ये छापलेल्या लेखात मानहानी केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र त्यांची जामिनावर मुक्तता झाली.