- बाळकृष्ण परब२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गेल्या दहा वर्षापासून केंद्रातील सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. काँग्रेस हा या आघाडीमधील प्रमुख पक्ष असला तरी या आघाडीची मोट बांधण्यामध्ये पुढाकार घेतला होता, तो जेडीयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी. त्यांच्याच पुढाकाराने विरोधी पक्षांची पहिली बैठक गतवर्षी जून महिन्यात पाटणा येथे झाली होती. तसेच पुढील काही बैठकांनंतर आता ही आघाडी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारसमोर कडवं आव्हान उभं करेल, असे संकेत मिळू लागले होते. मात्र डिसेंबरमध्ये लागलेले पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि आठवडाभरापूर्वी अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर देशातील चित्र अचानक बदलून गेलंय. कागदावर मजबूत असलेल्या इंडिया आघाडीत अचानक फुटाफूट होऊ लागली असून ही आघाडी जुळवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे नितीश कुमारच यू टर्न घेऊन एनडीएमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आता निवडणुकीपर्यंत तरी या आघाडीतील पक्ष एकत्र राहतील की नाही, याबाबत शंका निर्माण झालेली आहे. त्याबरोबरच या इंडिया आघाडीचा घटक असलेल्या महाविकास आघाडीचं काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा शत्रू नसतो, असं सतत म्हटलं जातं. मात्र, सतत इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या नितीश कुमार यांना नेमकं काय विशेषण द्यावं, असा प्रश्न राजकीय इतिहासकारांसमोर नक्कीच निर्माण होणार आहे. त्यातूनच सध्या त्यांच्याबाबत 'पलटूराम' ही संज्ञा सोशल मीडियावर खूप चर्चिली जात आहे. गेल्या ३० वर्षांत राजकीय अलटीपलटी खेळतच नितीशबाबूंनी राजकारणातील एकेक पायरी चढली आहे. १९९४ पासून आजपर्यंत त्यांनी आपल्या मूळ भूमिकेपासून वारंवार पलटी मारल्याची अनेक उदाहरणं मिळतील. २००५ मध्ये भाजपासोबत बिहारची सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमारांनी लालूंच्या जंगलराजमुळे कुप्रसिद्ध झालेल्या बिहारमध्ये सुशासन देण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांची 'सुशासन बाबू' अशी प्रतिमा निर्माण झाली. तसेच त्या जोरावर २०१० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर पंतप्रधानपदाची स्वप्नं पडू लागल्याने नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडले. मग ते आतापर्यंत त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या लालू प्रसाद यादव यांना जाऊन मिळाले. गेल्या दहा वर्षांत कधी लालू तर कधी भाजपा, अशी अलटी-पलटी खेळतच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपद टिकवलंय. पण यादरम्यान २०१० मध्ये तब्बल ११५ जागा जिंकणारा त्यांचा पक्ष सातत्याने आक्रसून ४५ जागांपर्यंत खाली आलाय.
याच नितीश यांनी पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेतून विरोधी पक्षांना एकत्र आणत 'इंडिया'चा घाट घातला. विविध प्रदेशात विखुरलेल्या विरोधी पक्षांमधील मातब्बर नेत्यांना पाटण्यात एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. याबदल्यात आपल्याला या आघाडीकडून पंतप्रधानपदाची उमेदवारी किंवा किमान निमंत्रकपद तरी मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र जसजशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या, तशी नितीशबाबूंची अस्वस्थता वाढत गेली. त्यात तेजस्वी यादव यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदी बसवण्यासाठी उतावीळ झालेल्या लालूंमुळे नितीश कुमार यांचं टेन्शन अधिकच वाढत होतं. त्यामुळे थेट 'यू टर्न' घेत ते एनडीएत दाखल झालेत. आता नितीश कुमारांना पलटूराम, अवसानघातकी म्हटलं जात असलं तरी त्यांनी पारडं बदलल्याने इंडिया आघाडीला निश्चितच मोठा धक्का बसला आहे.
त्याचं कारण म्हणजे, राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रा' काढत असतानाच, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली होती. तिकडे, आम आदमी पक्षानेही पंजाब आणि दिल्लीमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी केलीय. त्यात आता नितीश कुमार हेही दुरावल्याने इंडिया आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. कारण इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढले असते तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये ही निवडणूक भाजपासाठी जड गेली असती. मात्र ममतांच्या स्वबळावर लढण्याने आणि नितीश यांच्या एनडीएत जाण्याने या दोन्ही राज्यांमधील समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. २०१९ मध्ये बिहारमध्ये एनडीएने ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती यावेळी कठीण असली तरी नितीश यांना सोबत घेऊन बिहारमधून ३०-३५ जागा जिंकण्याची निश्चिती एनडीएने केलीय. त्याबरोबरच इंडिया आघाडी उभी करण्याचा घाट हा नितीश कुमार यांनीच घातला होता. मात्र तेच या आघाडीतून पळून गेल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात या आघाडीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. आधीच इंडिया आघाडीचे निमंत्रक, पंतप्रधानपदाचे उमेदवार, जागावाटप अशा कुठल्याही मुद्यावर एकमत होत नसतानाच महत्त्वाचे नेते या आघाडीतून बाहेर पडल्याने निवडणुकीच्या तोंडावर ही आघाडी चार पावले माघारी गेली आहे.
आता देशपातळीवर इंडिया आघाडी जवळपास फुटल्याने महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होणार, या आघाडीचं लघुरूप असलेली महाविकास आघाडी एकसंध राहून निवडणुकीला सामोरी जाऊ शकेल का?, असा प्रश्न विचारला जात आहे. नितीश कुमार यांच्याप्रमाणेच भाजपाचे महाराष्ट्रातील जुने सहकारी असलेले उद्धव ठाकरे हेही एनडीएमध्ये जातील का?, अशी कुजबूजही सुरू झालीय. खरं तर राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. मात्र भाजपा आणि उद्धव ठाकरेंमध्ये ज्या प्रकारची कटुता निर्माण झालीय, ती पाहता दोघेही निकट भविष्यात एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे. २०१९ मध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यातील समीकरणं बदलली होती. एकटा भाजपा विरुद्ध तीन बलाढ्य पक्षांची महाविकास आघाडी अशी लढत झाली असती तर ही निवडणूक भाजपाला जड गेली असती. मात्र प्रत्यक्षात अशी वेळ येणार नाही, याची तजवीज भाजपाच्या केंद्रातील महाशक्तीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून केली आहे.
याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात भाजपासोबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांची महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या आमने सामने आहेत. आता इंडिया आघाडीत फुटाफूट होत असली तरी महाविकास आघाडीमध्ये तशी फूट पडण्याची शक्यता नाही. त्याचं कारण म्हणजे मविआमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक पक्षाला कुठल्या ना कुठल्या कारणाने भाजपाचा वचपा काढायचा आहे. यातील ठाकरे गट तर भाजपा आणि शिंदे गटाला पराभूत करण्यासाठी इरेला पेटलेला आहे. मात्र एकट्या-दुकट्याने भाजपाचा पराभव करणं शक्य नाही, हेही मविआमधील सर्व घटक पक्षांना पुरेपूर माहीत आहे. भाजपाला हरवायचं असेल तर एकत्र येऊन बेरजेचं गणित साधावं लागेल, या जाणिवेतून मविआमध्ये इतर छोट्या पक्षांना सामावून घेण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मविआमध्ये सध्या कितीही गोंधळ आणि परस्परविरोध दिसला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीविरोधात महाविकास आघाडी एकत्र लढताना दिसणार आहे. कदाचित काही ठिकाणी जागावाटपातील पेचामुळे बंडखोरी होईल. एकत्र लढण्याशिवाय गत्यंतर नसल्याने इंडिया आघाडीचं काही झालं तरी महाविकास आघाडी मात्र महाराष्ट्रात एकत्रितरीत्या निवडणूक लढवताना दिसेल.