लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे नुकतेच पुढे आले होते. त्यापाठोपाठ आता भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचेही दुष्परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
बनारस हिंदू विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासात एक तृतीयांश लोकांमध्ये श्वसनमार्गाच्या संसर्गासह सर्दी, खोकला तापाची लक्षणे दिसली. कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास असलेल्यांमध्ये कोव्हॅक्सिनचे दुष्परिणाम अधिक होते. काही लोकांमध्ये स्ट्रोकचेही लक्षणे दिसली.
कोणते दुष्परिणाम?
४७.९% किशोरवयीन व ४२.२% प्रौढांमध्ये श्वसनमार्गाचे संक्रमण दिसले. किशोरवयीन मुलांमध्ये त्वचेशी संबंधित आजार (१०.५%), मज्जासंस्थेशी संबंधित विकार (४.७%), सामान्य विकार (१०.२%). प्रौढांमध्ये सामान्य विकार (८.९%), स्नायू, हाडांचे विकार (५.८%) आणि मज्जासंस्थेचे विकार (५.५%).