खळबळजनक! डीजेने घेतला तरुणाचा बळी; हृदयात रक्त साचले अन् नाचता नाचता खाली पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 02:06 PM2022-05-07T14:06:12+5:302022-05-07T14:06:34+5:30
१८ वर्षांचा तरुण लाल सिंह हा त्याच्या मित्राच्या लग्नासाठी आला होता. वर विजय याची वरात गावातून निघाली होती. लालसिंह त्यांच्या मित्रांसोबत डीजेच्या मागे नाचत होता.
मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. डीजेच्या आवाजामुळे वरातीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. डीजेवर नाचताना हा तरुण व्हिडीओ बनवत होता, तेव्हा तो खाली कोसळला. उठता येईना म्हणून त्याला त्याचे मित्र डॉक्टरांकडे घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्या तरुणाला डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हार्ट अॅटॅक आल्याचे कारण डॉक्टरांनी दिले. १८ वर्षांचा तरुण लाल सिंह हा त्याच्या मित्राच्या लग्नासाठी आला होता. वर विजय याची वरात गावातून निघाली होती. लालसिंह त्यांच्या मित्रांसोबत डीजेच्या मागे नाचत होता. तेव्हा तो मोबाईलवर चित्रिकरणही करत होता. तेवढ्यातच अचानक डान्स करता करता तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला.
त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्याला उज्जैनच्या ह़ॉस्पिटलला न्या, असे सांगण्यात आले. उज्जैनच्या डॉक्टरांनी लाल सिंहला मृत घोषित केले. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचे कारण समजले. त्याच्या हृदयामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. हॉस्पिटलचे डॉक्टक जितेंद्र शर्मा यांनी डीजेच्या मोठ्या आवाजामुळे असे झाल्याचे म्हटले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, डीजे किंवा इतर मोठ्या साउंड सिस्टीममधून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते तेव्हा शरीरात असामान्य हालचाली होतात. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल असलेला आवाज मानवी शरीरासाठी हानिकारक आहे. त्याचा परिणाम हृदय आणि मेंदू या दोन्हींवर होऊ शकतो.