ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ९ - स्मार्टफोन घेण्याची इच्छा व अतिरिक्त पॉकेट मनी मिळवण्याच्या नादात उत्तरप्रदेशमधील तिघा अल्पवयीन मुलांनी रक्तदान केल्याचे समोर आले आहे. एक बॉटल रक्तासाठी या मुलांना ५०० रुपये दिले जात असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी ब्लड बँकच्या तिघा कर्मचा-यांना अटक केली आहे.
उत्तरप्रदेशमधील लखनौ येथे एका ब्लड बँकमध्ये सर्व नियम पायदळी तुडवून रक्तदान शिबीर राबवले जात असल्याची माहिती उत्तरप्रदेशमधील आरोग्य यंत्रणेला मिळाली होती. यानुसार आरोग्य खात्यातील अधिकारी व पोलिसांनी कोहली ब्लड बँकेवर छापा घातला. या दरम्यान ब्लड बँकेने तिघा अल्पवयीन मुलांना पैशाचे आमीष दाखवून रक्तदान करायला लावल्याचे समोर आले. नियमानुसार १८ वर्षांवरील व्यक्ती रक्तदान करु शकतो. तसेच रक्तदात्याच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १३ वर असणे बंधनकारक आहे. मात्र ही तिन्ही मुले १२ ते १४ वर्षांमधील होते. या तिघांना पैशाचे आमीष दाखवण्यात आले होते. यातील एका मुलाने स्मार्टफोन घेण्यासाठी पैसे गोळा करत असून यासाठी मी रक्तदान केले अशी कबुली एका मुलाने दिली. तर घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी रक्तदान केले असे दुस-या मुलाने सांगितले.