- मयूर पठाडेभारताची लोकसंख्या किती आहे? आता ती आकड्यांत सांगण्याची गरज नाही. लोकसंख्येत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि कदाचित येत्या काही वर्षांत त्याबाबत भारतानं पहिला क्रमांकही पटकावलेला असू शकेल. तरीही आपल्याला वर्षाला तब्बल वीस लाख बाटल्यांची कमतरता पडते आणि लाखो लोकांचा जीव त्यामुळे संकटात येतो, अनेकांना तर केवळ रक्त न मिळाल्यामुळे भूतलावरची आपली जीवनयात्रा संपवावी लागते ही वस्तुस्थिती आहे. १४ जून. आजच्या जागतिक रक्दानदिवसानिमित्त काही संकल्पना आणि वस्तुस्थिती आपल्याला समजावूनही घ्याव्या लागतील.‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.’ ही केवळ उक्ती नाही, ते खरंही आहे. तरीही कोट्यवधी लोकांच्या आपल्या देशांत केवळ वेळेवर रक्त न मिळाल्यामुळेच लाखो लोक मृत्युमुखी पडावेत हा विरोधाभास का?त्याचीही काही कारणं आहेत. काही मिथकं, दंतकथा आहेत. त्या आपल्याला समजावून घ्याव्या लागतील आणि त्याची सत्यता काय आहे हेदेखील लक्षात घ्यावं लागेल.रक्तदानासंबंधी मिथकं, दंतकथा आणि सत्यता
मिथक १- रक्तदान करणं सुरक्षित नसतं.सत्यता- रक्तदान करणं पुर्णत: सुरक्षित असतं आणि ही सारी प्रक्रीया प्रशिक्षित अशा टीमकडूनच केली जाते. पहिल्याच वेळी रक्तदान करणाऱ्यांपैकी शंभरातल्या केवळ एक किंवा दोन टक्के लोकांना थोडी चक्कर येऊ शकते, पण काही वेळ विश्रांती आणि ज्यूस.. यासारखे अगदी सोपे उपाय त्यासाठी आहेत. मिथक २- रक्तदानामुळे सेक्स लाइफ कमी होते आणि कमजोरी येते.सत्यता- रक्तदान आणि सेक्स या दोन्ह्ी गोष्टींचा काहीही संबंध नाही.मिथक ३- ज्या लोकांना डायबेटिस, अॅलर्जिक आजार आहेत, ज्यांचं कोलेस्टोरॉल हाय आहे किंवा पूर्वी टीबीचं इन्फेक्शन झालेलं आहे अशा व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत. सत्यता- ज्या डायबेटिक व्यक्ती इन्सुलिनवर नाहीत, त्या रक्तदान करू शकतात. तसेच ज्यांचा टीबी पाच वर्षांपूर्वी बरा झालेला आहे, अशा व्यक्तीही रक्तदान करू शकतात. अॅलर्जिक व्यक्ती, पण ज्या औषध म्हणून स्टिरॉइड्सचा वापर करीत नाहीत, त्यांनाही रक्तदान करता येतं. ज्या व्यक्तींचं कोलेस्टोरॉल हाय आहे, पण ज्यांना हृदयविकार नाही, अशा व्यक्तीही रक्तदानास पात्र आहेत.
मिथक ४- रक्तदान करण्यासाठीची सुई खूप मोठी असते. त्याचा खूप त्रास होतो.सत्यता- इंजेक्शनची सर्वसाधारण सुुई आणि रक्तदानासाठीची सुई यात फारसा काहीच फरक नसतो. त्याचा त्रासही होत नाही.मिथक ५- स्त्रियांनी रक्तदान करू नये.सत्यता- ज्या स्त्रियांच्या शरीरातील हिमोग्लोबीनचं प्रमाण १२.५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी कोणतीही स्त्री रक्तदान करू शकते. स्त्रियांसाठी काही अपवाद मात्र आहेत. गर्भवती स्त्री, बाळाला अंगावर पाजत असणारी आई, मासिक धर्म सुरू असणारी स्त्री.. यांनी मात्र त्या त्या कालावधीत रक्तदान करू नये.मिथक ६- जास्त वेळा रक्तदान केल्यास त्यामुळे तुमच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होतो.सत्यता- याऊलट यासंदर्भात झालेली काही संशोधनं सांगतात, रक्तदानामुळे तुमचं आरोग्य सुधारतं, रक्तातील चिकटपणा कमी होतो, रक्तपेशींना टवटवी येते. तीन महिन्यांतून एकदा रक्तदान केल्यानं तुमच्या शरीरावर त्याची कोणतीच हानी होत नाही.