देवाळे : (वार्ताहर) सातवे (ता. पन्हाळा) येथील सदाशिव तुकाराम पानसकर या शेतकर्यांच्या शेतजमिनीच्या नुकसानीवरून मुख्याध्यापक असलेल्या शशिकांत जगन्नाथ मोरे (रा. सातवे, ता. पन्हाळा) याने पानसकर यांच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सदाशिव पानसकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक शशिकांत मोरे यांच्यावर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, मोरे यास पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. याबाबत कोडोली पोलिसांत व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सातवे येथील विलास आम्ब्रे व जखमी सदाशिव पानसकर यांचे ऊस क्षेत्र एकमेकांच्या शेजारी असून, विलास आम्ब्रे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी चालू होती. सदर शेतातील ऊस पानसकर यांच्या शेतजमिनीमधून जात होता. पानसकर यांनी आपल्या शेतातील पिकास पाणी पाजले असल्याने पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतामधून ऊस वाहतुकीस नकार दिला. पानसकर आणि आंम्बे्र शेतजमिनीचा वाद समजताच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरमालक मुख्याध्यापक शशिकांत मोरे यांनी सदर घटनेचा जाब विचारणेस घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी शाब्दिक बाचाबाची होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाणेचा प्रकार घडताच मुख्याध्यापक शशिकांत मोरे याने अचानक कुर्हाडीने प्राणघातक वार केला. त्यात पानसकर हे गंभीररित्या जखमी झाले. त्यावेळी मोरे याने तेथून पळ काढली. दरम्यान, पानसकर यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना गाडीतून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद पानसकर यांचा मुलगा संदीप पानसकर याने कोडोली पोलिसांत दिली असून, मुख्याध्यापक मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे स. पो. नि. शरद मेमाने यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घनवट पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. फोटो किरण जाधव या मेलवरून जखमी पानसकर यांचा फोटो पाठविला आहे..
सातवेत शेतकर्यावर खुनी हल्ला
By admin | Published: January 14, 2015 11:16 PM