लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा जबाब बदलला आहे. अशा परिस्थितीत ब्रिजभूषण यांच्यावर लावण्यात आलेला पोक्सो कायदा हटविला जाईल. त्यामुळे त्यांच्यावरील तत्काळ अटकेची टांगती तलवार दूर होऊ शकते.
ब्रिजभूषण यांच्यावर आता सज्ञान महिला कुस्तीपटूंचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, ज्यात त्वरित अटक करण्याची गरज नाही. दरम्यान, अयोध्येतील जनजागृती सभा रद्द केल्यानंतर आता ब्रिजभूषण सिंह ११ जूनला कैसरगंजमध्ये मोठी जाहीर सभा घेणार आहेत.
अल्पवयीन कुस्तीपटूचे २ जबाब
बळजबरीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न : दिल्ली पोलिसांकडे नोंदविलेल्या एफआयआरमध्ये, अल्पवयीन कुस्तीपटू आणि तिच्या वडिलांनी सांगितले की, वयाच्या १६ व्या वर्षी, झारखंडच्या रांची येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. येथे फोटो काढण्याच्या बहाण्याने ब्रिजभूषण यांनी मुलीला बळजबरीने जवळ ओढले आणि विनयभंग केला. ब्रिजभूषण यांनी मुलीला, ‘तू मला साथ दे आणि मी तुला साथ देईन,’ अशी ऑफर दिली. नंतर काही दिवसांनी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यातून ती कशीबशी बचावली.
खटल्यात भेदभाव
- मे २०२२ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपसाठी प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूशी ब्रिजभूषणच्या सांगण्यावरून भेदभाव केला.
- अल्पवयीन कुस्तीपटूच्या चाचणीदरम्यान, तिची लढत दिल्लीतील एका पैलवानाशी झाली, ज्यामध्ये पंच आणि मॅट चेअरमन दोघेही दिल्लीचे होते. हे नियमांचे उल्लंघन होते.
सर्व आश्वासने पूर्ण करणार : ठाकूर
कुस्तीपटूंना दिलेली सर्व आश्वासने सरकार पूर्ण करणार, अशी ग्वाही क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिली. १५ जूनपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा असेल तो न्यायालय घेईल. कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाईल. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.