मुंबई: गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसात कर्तव्य बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांमध्ये पालिकानं याबद्दलची कार्यवाही केली. बृहन्मुंबई महापालिकेच्या 'पी दक्षिण विभागाचे कर्मचारी जगदीश परमार (५४) आणि विजेंद्र बागडी (४०) या दोन कर्मचाऱ्यांचा 4 सप्टेंबरला मृत्यू झाला. अतिवृष्टीत कर्तव्य बजावत या दोन कर्मचाऱ्यांना मृत्यूनं गाठलं. याबाबत महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचं आणि नियमानुसार कर्मचाऱ्याची देणी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचं आदेश संबंधित खात्याला दिले होते.यानंतर सहआयुक्त अशोक खैरे, पी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव आणि घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर यांनी काल जगदीश परमार आणि विजेंद्र बागडी यांच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरीचं नियुक्ती पत्र आणि आज सफाई कामगार विमा योजनेंतर्गत रुपये एक लाख एवढ्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. बुधवारी (4 सप्टेंबर) झालेल्या अतिवृष्टी दरम्यान नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेचे ३२ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते. त्यावेळी पी दक्षिण विभागातील कामगार जगदीश परमार यांचं कर्तव्य बजावताना निधन झालं. तसंच महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगार विजेंद्र बागडी हे कर्तव्यावर असताना तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडले. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून त्वरित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सर्वोपचार रुग्णालयात' नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 4 दिवसांत नोकरी; महापालिकेचं संवेदनशील पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 3:23 PM