धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 07:28 AM2024-06-02T07:28:09+5:302024-06-02T07:28:39+5:30
अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटीतील ११ प्रवासी नदीत बुडाले, मात्र चार जण पोहून किनाऱ्यावर आले. त्याच वेळी तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील श्योपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या वादळामुळे एक बोट नदीत उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटीतील ११ प्रवासी नदीत बुडाले, मात्र चार जण पोहून किनाऱ्यावर आले. त्याच वेळी तीन मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनासह एसडीआरएफ बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बोट दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैनी येथील क्षेत्रपाल बाबाच्या ठिकाणी प्रसाद कार्यक्रमासाठी आलेले विजारपूर गावातील ११ जण बोटीने सीप नदी ओलांडून सरोदा गावातील नातेवाईकाच्या घरी जात होते.
वादळ आले आणि बोट नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत उलटली. बोटीतील चार जण कसेतरी पोहून बाहेर आले. हे सर्वजण विजरापूर, बडोदा येथील रहिवासी आहेत. बोट दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाने पुष्टी केली असून त्यात २५ वर्षीय परशुराम, १६ वर्षीय आरती, १५ वर्षीय लाली, ४ वर्षीय भूपेंद्र, १० वर्षीय श्याम, ८ वर्षीय रवींद्र आणि २३ वर्षीय परवंता यांचा समावेश आहे.
श्योपूरचे जिल्हाधिकारी लोकेश कुमार जांगीड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरोदा गावात अचानक आलेल्या वादळामुळे सीप नदीत एक भोवरा तयार झाला आणि बोट उलटली, त्यात सात जणांचा बुडून मृत्यू झाला. ज्यांचे मृतदेह बचाव पथकाने बाहेर काढले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासन पूर्णपणे मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.