ओडिसाच्या महानदीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. झारसुगडामध्ये पत्थर सेनी मंदिराजवळ बोट उलटल्याने सुमारे ५० ते ६० प्रवासी पाण्यात पडले. आतापर्यंत सात जणांचा मृतदेह सापडला असून ३५ जणांना स्थानिक मच्छीमारांनी वाचविले आहे. तर अद्याप ७ ते ८ जण बेपत्ता आहेत.
मृतांची आणि बेपत्ता व्यक्तींची ओळख अद्याप पटविण्यात आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तोवर स्थानिक मच्छीमारांनी त्यांच्या होड्यांद्वारे पाण्यात पडलेल्या बहुतांश लोकांना वाचविले होते.
या बोटीतून जवळपास ५० लोक पथरसेनी कुडा येथून बारगढ जिल्ह्यातील बंजीपल्ली येथे जात होते. शारदा गाट जवळ असताना हा अपघात घडला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आणखी सात लोकांना वाचविले. आणखी सात लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या कुटुंबाला चार लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच पाच पाणबुड्यांनाही घटनास्थळी पाठविले आहे.