पाटणा: बिहारच्या छपरा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मतियार गावाजवळ सरयू नदीत बोट उलटल्याने 18 जण बेपत्ता झाले. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर 15 जणांचा शोध सुरू आहे. पोलीस आणि पाणबुड्यांचे पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.
घटनास्थळी अंधार असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दीही झाली आहे. बचावकार्यात स्थानिक लोकही पोलिसांना मदत करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच छपराचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत. एकमाचे आमदार श्रीकांत यादव घटनास्थळी उपस्थित असून अपघाताची माहिती घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील सर्व लोक शेतकरी आहेत, जे डायरा येथे शेती करतात. डायरा येथे शेतीचे काम आटोपून सर्वजण नावेत बसून आपापल्या घरी परतत असताना नदीत त्यांची बोट उलटली. अपघाताच्या वेळी नदीकाठावर काही ग्रामस्थ होते. बोट उलटताना पाहून त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून इतर लोकही घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत बोट बुडाली होती. लोकांनी घाईघाईने मांझी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माहिती दिली.