ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे. भारतीय लष्कराने अशी कुठलीही सर्जिकल स्ट्राईक केली नसल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा आहे तर, भारतातील काही मूठभर राजकारणी या कारवाईचे पुरावे मागत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणा-या प्रत्यक्षदर्शींनी भारतीय लष्कराच्या कारवाईत दहशतवाद्यांसह त्यांचे तळ उद्धवस्त झाल्याची माहिती दिली आहे. २९ सप्टेंबरची सकाळ होण्याआधीच जे दहशतवादी या कारवाईत मारले गेले त्यांचे मृतदेह ट्रकमध्ये भरुन अज्ञात स्थळी नेण्यात आले. तिथे या मृतदेहांचे दफन करण्यात आले.
आणखी वाचा
इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राने नियंत्रण रेषेपलीकडे रहाणा-या नागरीकांशी संर्पक साधून याबद्दल माहिती जाणून घेतली. दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्यासाठी जिथे थांबायचे ती इमारत स्पेशल फोर्सेच्या कमांडोनी नष्ट केली. इंडियन एक्सप्रेसने प्रत्यक्षदर्शी आणि गुप्तचर यंत्रणांकडून जी माहिती मिळवलीय त्यानुसार या कारवाईत ३८ पेक्षा कमी दहशतवादी मारले गेलेत.
सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरीकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहातात. इंडियन एक्सप्रेसने सीमेवरील गावक-यांच्या मदतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणा-या त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. चॅटवरुन त्यांना काही प्रश्न विचारले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
नियंत्रण रेषेपासून ४ किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून दोन प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जाते. मध्यरात्री या भागात गोळीबार आणि स्फोटाचे मोठे आवज झाल्याचे प्रत्यशदर्शीनी स्थानिकांच्या हवाल्याने सांगितले.
रात्री गोळीबाराच्या आवाजामुळे येथील लोक बाहेर पडले नाहीत त्यामुळे त्यांनी भारतीय सैनिकांना पाहिले नाही. पाच ते सहा मृतदेह ट्रकमध्ये भरुन चालहाना येथील लष्कर-ए-तोयबाच्या तळावर नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दुस-यादिवशी शुक्रवारी चालहाना येथील एका मशिदीत साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेण्यात आली असे प्रत्यक्षदर्शींना स्थानिकांकडून माहिती देण्यात आली. या दहशतवाद्यांनी सीमेचे संरक्षण करण्यात कमी पडल्याबद्दल पाकिस्तानी लष्कराला दोष दिला. भारताच्या या कारवाईमुळे मात्र लष्कर आणि अन्य दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला आहे.