बक्सर, दि. 11 - बिहारमधील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी गाझियाबादमधील रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुकेश पांडे असे मृत अधिका-याचे नाव असून ते बिहारच्या बक्सरमध्ये जिल्हा न्यायदंडाधिकारी पदावर कार्यरत होते. गुरुवारी रात्री रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली आहे.
गाझियाबाद रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. मुकेश पांडे 2012 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. मला आयुष्याचा कंटाळा आला आहे, मला माफ करा, मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहीले होते. मुकेश पांडे दिल्लीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील रुम नंबर 742 मध्ये उतरले होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मुकेश पांडे काही दिवसांपूर्वी बक्सरमध्ये न्यायदंडाधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वी ते कटिहार येथे डीडीसी होते. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने त्यांच्यासोबत काम करणा-या सहका-यांना जबर धक्का बसला आहे. ते निघताना पाटण्याला चाललो असे सांगून निघाले होते. मुकेश पांडे यांनी नेमकी कोणत्यावेळी कशा पद्धतीने आत्महत्या केली ते आता सांगता येणार नाही असे तपास अधिका-यांनी सांगितले.
पांडे आत्महत्या करणार असून ते पश्चिम दिल्लीतील मॉलच्या दिशेने गेले आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलीस तात्काळ त्या दिशेने गेले. पण मुकेश पांडे तिथे नव्हते. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पांडे मॉलमधून बाहेर पडून मेट्रो स्टेशनच्या दिशेने जाताना दिसले. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मुकेश पांडे यांच्या अकाली मृत्यूबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दु:ख व्यक्त केले. ते सक्षम अधिकारी होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे नितीश कुमारांनी म्हटले आहे. सक्षम आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून मुकेश पांडे यांची ओळख होती.