काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरमधून सुरु झाली आहे. राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. ही यात्रा आसाममध्ये पोहोचल्यानंतर अधिक चर्चेत आली. कारण, २२ जानेवारी रोजी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता. मात्र, दुसरीकडे राहुल गांधींना आसाममधील मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आले होते. त्यानंतर, राहुल गांधींवर एफआयआरही दाखल झाला आहे. त्यामुळे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधींमध्ये शाब्दीत वाद रंगला आहे. त्यातच, आता हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा असाममधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. त्यानंतर, असामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी(25 जानेवारी) या यात्रेवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी यात्रेच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसवर जातीय संघर्ष भडकवण्याचा आरोप केला. तसेच, राहुल गांधींकडून यात्रेत बॉडी डबल घेऊन फिरत असल्याचा आरोपही बिस्वा यांनी एका वृत्ताच्या आधारे केला आहे.
राहुल गांधींचा डुप्लीकेट?
यावेळी सरमा यांनी एक मोठा दावा केला. राहुल गांधी त्यांच्या यात्रेत “बॉडी डबल” (डुप्लीकेट) वापरतात. याचाच अर्थ बसमध्ये बसून खिडकीतून लोकांकडे पाहणारी व्यक्ती बहुधा राहुल गांधी नसावी, असा दावा हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तसेच, आई कामाख्या देवीच्या मंदिरात दर्शनाची तयारी पूर्ण केल्यानंतरही त्यांनी देवीचे दर्शन घेतले नाही. बाटद्रवा पोलीस स्टेशनला जाण्यासाठी २ तास थांबू शकले नाहीत. लचित बारफुकन आणि भूपेन हजारिका यांच्या समाधीजवळून गेले, पण अभिवादन केले नाही. बारपेटा येथील प्रसिद्ध सत्रा आणि धुब्रीच्या ऐतिहासिक गुरुद्वाराला भेट दिली नाही. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवानंतर आसाममधील पवित्र स्थळांना भेटी न देऊन दंगली घडवण्याचा त्यांचा कट होता का? असा सवालही त्यांनी केला.
मतदार उत्तर देणार
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, काँग्रेसचा आत्मा मारला गेला आहे. सर्वात जुना पक्ष गांधीवादी तत्त्वज्ञानापासून दूर गेला असून आता सॉफ्ट नक्षलवादी बनला आहे. गुवाहाटीमध्ये आम्हाला याची झलक पाहायला मिळाली. राम मंदिराच्या अभिषेकावेळी राज्यात संघर्ष झाला, पण आमच्या पक्षाच्या लोकांनी आणि रामभक्तांनी स्वतःला ताब्यात ठेवले आणि राज्यात अनुचित प्रकार घडू दिला नाही. आसामची जनता लोकसभा निवडणुकीत तुमच्या अहंकाराला नक्की उत्तर देईल, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधींना अटक होणार
दरम्यान, हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी (24 जानेवारी) राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल, अशी माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही राहुल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. विशेष तपास पथक तपास करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना अटक केली जाईल. भारत जोडो यात्रेदरम्यान हिंसाचार भडकवल्याबद्दल राहुल गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.