जेव्हा सैन्याचा जवान शहीद होतो, तेव्हा देशभरात हळहळ व्यक्त होते. कोणाचे नुकतेच लग्न झालेले असते, तर कोणी आपल्या अपत्याचा चेहराही पाहिलेला नसतो. कोणाचा एकुलता एक मुलगा असतो. या जवानाच्या जाण्याने त्याच्या घरातच नाही तर गावात, पंचक्रोशीत आक्रोशाची भावना असते. असेच एक कुटुंब गेल्या १६ वर्षांपासून आपल्या मुलाची वाट पाहत होते. उत्तर प्रदेशच्या मुरादनगरच्या हिसाली गावात राहणारे जवान अमरीश त्यागी (Amrish Tyagi) यांचा मृतदेह 16 वर्षांनी बर्फाखाली सापडला. (indian army jawan dead body found after 16 years in garhwal himalaya)
त्यागी कुटुंबाला त्याच्या मृतदेहासाठी 16 वर्षे वाट पहावी लागली. 23 ऑक्टोबरला सियाचीनहून परतत असताना उत्तराखंडच्या हरशील येथील दरीत 4 जवान कोसळले होते. यापैकी तीन जवानांना मृतदेह सापडला होता. परंतू अमरीश त्यागी यांचा मृतदेह सापडला नव्हता. दोन दिवसांपूर्वी तिथे बर्फ वितळल्यामुळे एक मृतदेह दिसत होता. त्यावरील कपडे आणि काही कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली.
कुटुंबाला वाटले होते, की अमरीश जिवंत असेल. त्यामुळे त्याचे श्राद्ध घातले नाही. नातेवाईक सांगत असायचे की, अमरीश आता जिवंत नाही. मात्र, कुटुंबाचा त्यावर विश्वास नव्हता. एक ना एक दिवस तो परत येईल अशा आशेवर सारे जगत होते. आता भारतीय सैन्य दल अमरीशचे पार्थिव घेऊन आली की आम्ही त्याचे सर्व संस्कार करू, असे कुटंबीयांनी सांगितले.
अमरीश यांचा मोठा भाऊ राम कुमार त्यागी यांनी सांगितले की, अमरीश जिवंत असेल अशी आशा आम्ही सोडली नव्हती. तो प्राण वाचवून इकडे तिकडे राहत असेल. 24 सप्टेंबरला रात्री उशिरा दिल्लीच्या मुख्यालयातून 3 सैन्य अधिकारी घरी आले. त्यांनी अमरीश यांचा मृतदेह उत्तराखंडमध्ये सापडल्याचे सांगितले आणि दु:खाचा डोंगर कोसळला.
पत्नीने दिला मुलीला जन्मअमरीश यांचे लग्न 2005 मध्ये मेरठला झाली होती. जेव्हा ते बेपत्ता झाले तेव्हा त्यांची पत्नी गर्भवती होती. या अपघातानंतर ५ महिन्यांनी तिने मुलीला जन्म दिला. अमरीश बेपत्ता असल्याने त्याच्या पत्नीचा दुसरा विवाह वर्षभराने लावून देण्यात आला होता. आता अमरीश यांचे पार्थिव सोमवारी आणण्यात येणार आहे.