वास्को: २६ नोव्हेंबर रोजी गोव्याजवळील समुद्रात कोसळलेल्या ‘मीग २९के’ प्रशिक्षण विमानातील बेपत्ता असलेल्या दुसऱ्या वैमानिकाचा मृतदेह सोमवारी (दि.७) नौदलाला समुद्रात आढळला. वैमानिक कमांडर निशांत सिंग याचा मृतदेह गोवा समुद्राच्या ३० मैल दूर तसेच समुद्राच्या ७० मीटर खोल पाण्याखाली सापडल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली.
भारतीय नौदलाचे ‘मीग २९के’ प्रशिक्षण देणारे विमान २६ नोव्हेंबरला समुद्रात कोसळले होते. दुर्घटनाग्रस्त झालेल्या त्या विमानात घटनेवेळी दोन वैमानिक असून यातील एका वैमानिकाचा शोध लागल्यानंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. त्या वैमानिकाची प्रकृती चांगली असल्याची माहीती नौदलकडून प्राप्त झाली होती. दुर्घटनाग्रस्त झालेल्या त्या विमानातील दुसऱ्या वैमानिकाचा शोध लावण्यासाठी नौदलाने गेल्या ११ दिवसांत अथक प्रयत्न केल्याची माहीती सूत्रांकडून उपलब्ध झाली.
विमान समुद्रात कोसळल्यानंतर बेपत्ता वैमानिकाला शोधण्यासाठी नौदलाने ९ जहाजे (वोरशिप), १४ विमाने (एअरक्राफ्ट) तसेच नौदलाचे फास्ट इंन्टरसेप्टर क्राफ्ट समुद्रातील त्याठीकाणी कामाला लावल्याची माहीती नौदल सूत्रांकडून प्राप्त झाली होती. तसेच त्या वैमानिकाला शोधण्यासाठी मरीन व कोस्टल पोलीसांची मदत घेण्यात येत होती. दुर्घटनेच्या ११ दिवसानंतर बेपत्ता झालेल्या वैमानिक कमांडर निशांत सिंग याचा शोध लागल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली. समुद्रात सापडलेला मृतदेह कमांडर सिंग याचा असल्याचे एकदम निश्चित करून घेण्यासाठी त्याच्या मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी करण्यात येणार असल्याची माहीती नौदल सूत्रांनी दिली. दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अवषेश समुद्रात मागील दिवसात आढळल्याची माहीती नौदलाकडून प्राप्त झाली होती.