जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये दहशतवाद्यांनी दोन जवानांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण केलेल्या दोन जवानांपैकी एका जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दुसऱ्या एका जवानाचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी या सैनिकांचे अपहरण केले होते.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये बुधवारी सुरक्षा दलांना प्रादेशिक लष्कराच्या जवानाचा मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. लष्कराने अद्याप कोणत्याही दहशतवादी हल्ल्याबाबत काहीही सांगितलेले नाही. हिलाल अहमद भट असे मृतदेह सापडलेल्या सैनिकाचे नाव आहे. हिलाल ८ ऑक्टोबर रोजी कोकरनागच्या काजवान वनक्षेत्रात दहशतवादविरोधी कारवाईसाठी गेला होता आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याला शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी रात्रभर शोध मोहीम राबवली होती. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह अनंतनागमधील सांगलानच्या जंगलात सापडला.
यापूर्वी सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये दोन जवानांचे अपहरण करण्यात आले होते. प्रादेशिक लष्कराच्या दोन सैनिकांचे अपहरण करण्यात आले असून त्यापैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे, अशी माहिती समोर आली होती. यानंतर लष्कराने शोध मोहीम सुरू केली होती. मात्र त्यातील हिलाल अहमद भटचा मृतदेह लष्कराला सापडला आहे. मृतदेह सापडल्यानंतर तो पुढील सोपस्कारासाठी रुग्णालयात नेण्यात आला आहे.
श्रीनगर येथील लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, "गुप्त माहितीच्या आधारे, ८ ऑक्टोबर रोजी, भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि इतर यंत्रणेसह कोकरनागच्या काझवान जंगलात संयुक्त दहशतवादविरोधी अभियान सुरू करण्यात आले आहे. ही कारवाई रात्रभर सुरू राहिली."
दरम्यान, यापूर्वी २ ऑगस्ट २०२० रोजी काश्मीरमधील हरमन, शोपियान येथे दहशतवाद्यांनी प्रादेशिक लष्कराच्या जवानाची हत्या केली होती. शाकीर मंजूर वागे हा तरुण घराजवळून बेपत्ता झाला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केल्याचे उघड झाले. शाकीर वाजे हे अवघ्या २४ वर्षांचे होते. त्याच्या कुटुंबीयांना पाच दिवसांनी शाकीरचे कपडे घराजवळ सापडले. शाकीरचे अपहरण झाल्याच्या एका वर्षानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये कुलगाम जिल्ह्यात त्याचा मृतदेह सापडला होता. तपासानंतर पोलिसांनी शाकीरच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर वडील मंजूर अहमद यांनी मुलाचा मृतदेह ओळखला. शाकीर दक्षिण काश्मीरमधील १६२-टीएमध्ये तैनात होते. बकरीदला ते त्यांच्या घरी गेले होते. अपहरण करण्यासोबतच दहशतवाद्यांनी त्यांची गाडीही जाळली होती.