नवी दिल्ली - कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहेत. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. मोदींनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. यानंतर अनेक नेतेमंडळींनी देखील लस घेतली आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या एका नेत्याने अजब दावा केला आहे.
छत्तीसगडच्या कवर्धा येथील बोडला नगरपंचायतीच्या अन्न व नागरी पुरवठा आणि आरोग्य व वैद्यकीय विभाग अध्यक्ष काँग्रेस नेते ओमप्रकाश शर्मा यांनी कोरोना लसीबद्दल अजब दावा केला आहे. थेट धर्माशी लसीचा संबंध जोडल्याची घटना समोर आली आहे. शर्मा यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. "कोरोना लसीमध्ये गाय, डुक्कर आणि गर्भपात केलेल्या बाळाच्या मांसाचा समावेश आहे. त्यामुळे, धर्माचा आधार देत, मला ही लस घेण्यापासून सूट द्यावी" अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
"माझा धर्म हिंदू आहे आणि आमच्या धर्मात या गोष्टींचं सेवन पाप मानलं जातं तसंच याचा निषेध केला जातो. याच कारणामुळे मला आणि माझ्या परिवाराला ही लस घेण्यापासून सूट मिळावी. या लसीमुळे आमचा धर्म भ्रष्ट होईल" असं ओमप्रकाश शर्मा यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात डॉ. विलास जगदाळे विरुद्ध भारत सरकार अशी (15232,2019) याचिका दाखल केली गेली असल्याचे काँग्रेस नेत्यानं म्हटलं आहे. यातही धर्माच्या आधारे सूट देण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्याचं असं म्हणणं आहे, की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 मध्येही याबाबत उल्लेख आहे. याशिवाय या लसीचे अनेक साईड इफेक्ट आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण
मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे.