ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 27 - एका 12 वर्षांच्या मुलीला विजेचा जबरजस्त धक्का लागल्यानंतर तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी कुटुंबीयांनी तिला जखमी अवस्थेतच जमिनीत पुरल्याचा अघोरी प्रकार समोर आला आहे. केवळ श्वास घेता यावा यासाठी तिचा चेहरा वगळता संपूर्ण शरीर जमिनीत पुरण्याचा प्रताप तिच्या कुटुंबीयांनी केला. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे.
या मुलीचे नाव मुस्कान असून घराच्या छतावर खेळत असताना तेथील लटकणा-या वायर्सच्या संपर्कात ती आली, यावेळी मोठा स्फोट होऊन तिला विजेचा धक्का लागल्याने ती गंभीर जखमी झाली आणि बेशुद्ध होऊन खाली कोसळली. यानंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी कुटुंबीयांनी तिला जमिनीत पुरले. 'विजेचा धक्का लागल्याने शरीरावर होणारा वाईट परिणाम जमीन शोषून घेते, आणि असे केल्याने ती लवकर बरी होईल', म्हणून असे अघोरी उपचार केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, त्यांच्या या अघोरी उपचारामुळे मुस्कानची प्रकृती अधिक गंभीर झाली, यानंतर स्थानिकांनी तातडीने तिला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी तिचा उजवा हात आणि पाय वीजेचा धक्का लागल्याने 90 टक्के भाजल्याचे डॉक्टरांना आढळले.