उत्तर प्रदेशातल्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून उत्तर पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व गावात येणारे रस्ते पोलिसांनी सील करून नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी पत्रकारांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतले, त्यावेळी कुटुंबाने खळबळजनक आरोप केला की, पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पीडित कुंटुंबाला पीडित मृत मुलीचा चेहरा न दाखवताच परस्पर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यामुळेच आणखी या घटनेबाबत देशात संताप निर्माण झाला. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी स्थापन केली असून ते तपास करत आहेत. मात्र, एआयटी किंवा सीबीआयच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही असेही कुटुंबाने सांगितले आहे. या प्रकरणात पोलिसांवरही कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे डीएम आणि जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली, त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतले. तसेच त्यांना संपूर्ण केस बदलून टाकू अशी धमकी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पूर्ण केस बदलून टाकेन, काहीच होणार नाही, डीएमने धमकावल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप
पीडितेचा भाऊ पोलिसांचा पहारा चुकवून शेतातून लपून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीपर्यंत कसाबसा पोहोचला. त्यावेळी त्याने सांगितले की, 'पोलिसांनी आमच्याकडून मोबाइल फोन हिसकावून घेतले आणि कुणाशीही संपर्क साधू दिला नाही. घरातून कुणालाही बाहेर येण्यास मनाई केली आहे. आमच्या कुटुंबाला मीडियाशी बोलायचे आहे. मात्र, आम्हाला घरातून बाहेर येता येत नाही. पोलिसांनी घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. घरासमोर, रस्ते, शेतात पोलीस तैनात करण्यात आले आहे. याला विरोध केला असता डीएम प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या वडिलांच्या छातीवर लाथ मारली होती. त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर सर्वांना घरात बंद करण्यात आले असल्याची माहिती पीडित्याच्या भावाने मीडियाला सांगितली.