नवी दिल्ली : महिलेचे शरीर एक मंदिर आहे, असे विधान करीत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. अलीकडे हर्षवर्धन आणि वाद हे जणू समीकरणच बनले आहे. गुरुवारी हर्षवर्धन यांनी वक्तव्य केल्यानंतर अनेकांनी टिष्ट्वटरवर संतापजनक प्रतिक्रिया देत निषेध नोंदविला.दिल्लीतील एका महिला महाविद्यालयाच्या सुवर्णजयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी शहरी भागातील महिलांबाबत वाईट वर्तणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा संदर्भ देत हे विधान केले.महिलेचे शरीर एक मंदिर आहे. सुदृढ महिलांची नवी पिढी उदयाला आल्यास कुटुंब, समाज आणि देशासाठी ते स्वास्थ्यवर्धक ठरते. प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडत असते. मुलांची माता, एक शिक्षक यापेक्षाही मूल्यरक्षणात तिची भूमिका महत्त्वाची असते, असे हर्षवर्धन म्हणाले होते. त्यांचे हे विधान टिष्ट्वटरवर फिरल्यानंतर गुरुवारी त्यावर प्रतिक्रियांचा भडिमार सुरू झाला. पेशाने डॉक्टर असलेली व्यक्ती अशा दीनवाण्या भाषेचा वापर करते ही बाब संतापजनक असल्याचे काहींनी म्हटले, तर काहींनी त्यांची टर उडविली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महिलेचे शरीर एक मंदिर - हर्षवर्धन
By admin | Published: August 30, 2014 3:03 AM