पत्नीच्या संमतीशिवाय ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही- गुजरात हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 11:27 AM2018-04-03T11:27:51+5:302018-04-03T11:27:51+5:30
पत्नीच्या संमतीशिवाय पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही.
नवी दिल्ली- पत्नीच्या संमतीशिवाय पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही, असा निर्णय गुजरात हायकोर्टाने सोमवारी दिला आहे. वैवाहिक बलात्कार हा अन्याय असून कायद्यानुसार तो गुन्हा ठरला पाहिजे, असं मतही हायकोर्टाने मांडलं आहे. पत्नीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे असेल तर पत्नी पतीवर वैवाहिक बलात्काराचा आरोप लावू शकत नाही.
गुजरात हायकोर्टाचे न्यायाधीश जे बी पारदीवाला यांच्यासमोर सोमवारी एका तरुणाच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. डॉक्टर असणाऱ्या एका महिलेने तिच्या पतीविरोधात बलात्कार व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. तक्रारकर्ती महिला व तिचा पती दोघेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. या तक्रारीनंतर या तरूणाने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात भारतीय दंड विधानातील कलम ३७६ व कलम ३७७ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी तरुणाने हायकोर्टात याचिका दाखल करून केलीहोती.
न्यायाधीश जे बी पारदीवाला यांनी सोमवारी दिलेल्या निकालात त्या तरुणाविरोधात बलात्कारांतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असं स्पष्ट केलं. भारतीय दंड विधानातील कलम ३७५ मध्ये पतीकडून होणाऱ्या बलात्काराचा समावेश नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोपीविरोधात कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं.