नवी दिल्ली- इथोपियन दुर्घटनेनंतर भारतानं बोइंग 737 मॅक्स-8 विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. इथोपियन एअरलाइन्सचे विमान बोइंग 737 (मॅक्स 800) कोसळल्यानंतर जगातील किमान 10 देशांनी बोइंगची त्या पद्धतीची विमाने जमिनीवर उतरवली आहेत. या बोइंग 737 मॅक्स-8 विमान दुर्घटनेत 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. बोइंगच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर भारतानं या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. स्पाइस जेट, जेट एअरवेज एअरलाइन्सकडे असलेल्या बोइंग विमानांचा वापर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) बोइंगच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ही विमानं उड्डाणांसाठी तंदुरुस्त आहेत, याची खात्री पटत नाही, तोपर्यंत या विमानांचा उड्डाणासाठी वापर करू नये, असेही डीजीसीएने सांगितले आहे. तसेच या विमानांचे उड्डाण करणाऱ्या पायलटकडे किमान 1000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वीच इथियोपियात 737 - मॅक्स विमान कोसळून 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे.स्पाइस जेट या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीकडे बोइंगची 13 विमाने आहेत. तर, 155 विमानांची ऑर्डर दिलेली आहे.उड्डाणांवर प्रतिबंध आणणा-या देशांच्या यादीत भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझिल, चीन, सिंगापूर यांचा समावेश झाला आहे. दक्षिण कोरयातील एका कंपनीनेही बोइंगचे उड्डाण थांबविले.अमेरिका करणार कारवाईअमेरिकेच्या विमान वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, बोइंग 737 मॅक्स 8 मध्ये सुधारणा करण्यास सांगण्यात येणार आहे. तथापि, अमेरिकेने अद्याप बोइंग विमानांच्या उड्डाणावर प्रतिबंध आणलेले नाहीत.