नवी दिल्ली - संरक्षण क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी बोईंगने भारतासमोर F/A-18 हॉर्नेट फायटर विमान विक्रीचा प्रस्ताव ठेवला आहे. बाईंगची या संदर्भात भारतीय नौदलाबरोबर चर्चा सुरु आहे. दक्षिण आशियातील संरक्षण बाजारपेठेचा मोठा हिस्सा मिळवण्याचा बोईंगचा प्रयत्न आहे. भारत हा शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे.
F/A-18 फायटर विमानांचे तांत्रिक परिक्षण अद्याप बाकी आहे. बोईंगच्या डिफेंन्स शाखेचे उपाध्यक्ष जेने कुन्निघम यांनी सिंगापूर एअर शो दरम्यान ही माहिती दिली. बोईंगचा KC-46 हे लष्करी वाहतूक विमानही भारतासह अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न आहे. हवेमध्येच फायटर विमानामध्ये इंधन भरण्यासाठी KC-46 उपयुक्त ठरते.
भारतीय नौदलाला विमानवाहू युद्धनौकांसाठी 57 नवीन लढाऊ विमाने खरेदी करायची आहेत. त्यासाठी भारतीय नौदलाने मागच्यावर्षी प्रस्ताव मागवला होता. नौदलाच्या हवाई शाखेला 100 लढाऊ विमानांची गरज आहे. येत्या काहीवर्षात मोदी सरकारने संरक्षण साहित्यावर 250 अब्ज डॉलर खर्च करण्याची योजना आखली आहे. यामध्ये लढाऊ विमानांपासून ते गन आणि हेलमेटचा समावेश आहे. मेक इन इंडिया अंतर्गत परदेशी कंपन्यांनी देशी कंपन्यांना सोबतील घेऊन देशांतर्गत संरक्षण उत्पादन करण्याची मोदी सरकारने योजना आखली आहे.