चंद्रपूर - ताडोबा सफारीसाठी छत्रपती संभाजीनगर व मुंबई येथील पर्यटकांना ऑनलाइन बोगस तिकीट देऊन फसवणूक करणाऱ्या एजंटला दुर्गापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केयुज दत्ता कडूकर (रा. चंद्रपूर) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे.
मनीष प्रभाकर बावसकर (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी १८ जणांच्या सफारी बुकिंगसाठी एजंट केयुज कडूकरसोबत संपर्क केला. बावसकर यांनी २५ मार्च २०२३ रोजी बुकिंगसाठी २५,५०० रुपये, २७ मार्चला ३,००० रुपये, १४ एप्रिलला १०,४०० असे एकूण ३८,९०० रुपये फोन पेद्वारे कडूकरला पाठवले व जून २०२३ रोजीची सफारी बुकिंग केली होती. ते बुकिंगकरिता येऊ न शकल्याने रक्कम कडूकरकडे जमा होती. नव्या वर्षात बुकिंगकरिता बावसकर यांनी कडुकरसोबत संपर्क साधून पुन्हा १८ नोव्हेंबर २०२३ रोजी ५ हजार रुपये पाठवले. त्यानुसार २७ जानेवारी २०२४ रोजीची त्यांची बुकिंग कन्फर्म झाली होती.
बावसकर कुटुंबासह ताडोबा सफारीकरिता मोहुर्ली गेट येथे गेले. त्यांनी तिकीट दाखवले असता ते बोगस असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. बावसकर यांनी लगेच पोलिसांत आपबीती कथन केली. पोलिसांनी कडूकरला अटक केली.
मुंबईच्या पर्यटकांना चार बोगस तिकिटे- मुंबईतील राकेशकुमार मोतीलाल वाजपेयी यांनी ६ जानेवारीला ताडोबा सफारीकरिता चार ऑनलाइन तिकिटे बुक करून गुगल पेद्वारे २२ हजार ५०० रुपये पाठविले होते. - ते पर्यटनाला आल्यानंतर त्यांची चारही तिकिटे बोगस निघाली. त्यामुळे वाजपेयी यांनीसुद्धा बावसकर यांच्याशी मिळून पोलिसांत तक्रार दिली होती.