बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या मागाडी रोडवर सोमवारी एमएम फूड प्रॉडक्ट्स कंपनीच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. कारखान्यात सात जण काम करत होते, यादरम्यान दुपारी 2.45 वाजता ही घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि मदतकार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. या घटनेत कारखान्यातील सर्वजण आगीच्या विळख्यात आले होते, पण यातील तिघांना वाचवण्यात आलं. सध्या पोलिस आणि अग्निशमन विभाग आग लागण्यामागच्या कारणांचा शोध घेत आहेत.
बंगळुरू पश्चिमचे डीसीपी संजीव पाटील म्हणाले की, मृतांमध्ये बिहारमधील दोन मजूरांचा समावेश आहे. याशिवाय या अपघातात दोन महिलांसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.