चेन्नई : तामिळनाडूच्या कुड्डालूर जिल्ह्यात न्येवेली लिग्नाईट कंपनीच्या औष्णिक वीज केंद्रात बुधवारी सकाळी बॉयलरचा स्फोट होऊन सात कंत्राटी कामगार ठार झाले, तर आणखी १७ कामगार जखमी झाले. याच कंपनीत गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दुर्घटना आहे. गेल्या ७ मे रोजी झालेल्या बॉयलर स्फोटात सहा कामगारांना प्राण गमवावा लागला होता.
न्येवेली लिग्नाईट ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक कंपनी आहे. मुळात कोळसा खाण कंपनी म्हणून स्थापन झालेल्या या कंपनीने नंतर त्याच कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प सुरू केला. तेथे प्रत्येकी २१० मे.वॉ. क्षमतेचे सात संच आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले व केंद्राकडून सर्व मदतीचे आश्वासन दिले.मरण पावलेले सर्व कामगार २५ ते ४२ वयोगटातील होते व ते ४० टक्क्यांहून अधिक भाजले, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी सांगितले. सकाळी १० वाजेच्या सुमारास वीज केंद्रातील सातव्या युनिटमधील तिसरा बॉयलर सुरू करीत असताना हा स्फोट झाला. सर्व जखमींना आधी कंपनीच्या व नंतर चेन्नई येथील इस्पितळात दाखल केले गेले.