रायबरेली : गुजरात दौरा अर्धवट सोडून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी रायबरेली जिल्ह्याच्या उंचाहार नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनला (एनटीपीसी) भेट दिली. बॉयलर फुटून तिथे मरणाºयांची संख्या २६ झाली आहे. भेटीनंतर राहुल म्हणाले की, वेळेपूर्वीच हे संयंत्र सुरू केल्याने ही दुर्घटना घडल्याचे लोक सांगतात. त्यामुळे याची चौकशी व्हायलाहवी.त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. पीडित कुटुंबांना मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर ते संयंत्र परिसरात गेले. घटनास्थळी राहुल गांधी व केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह हे समोरासमोर आले होते. राहुल यांच्यासोबत गुलाम नबी आझाद व राज बब्बर होते.मृतांच्या कुटुंबीयांना २० लाख : एनटीपीसीने आधी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही रक्कम वाढवून आता २० लाख रुपये करण्यात आली आहे.पंतप्रधानांकडून २ लाख : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.चौकशी समिती : उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा म्हणाले की, एनटीपीसीच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती ३० दिवसांत अहवाल देणार आहे.
बॉयलर स्फोट; मृतांची संख्या २६ वर,राहुल गांधी यांनी केली पाहणी, जखमी ६३ लोकांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:58 AM