इंदूर: मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं बोलेरोवरील नियंत्रण सुटलं. चालकानं ब्रेक दाबताच बोलेरो उलटली. कारचा वेग इतका जास्त होता की ती ५ सेकंदांत ७ वेळा उलटली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
दुचाकीला वाचवण्यासाठी बोलेरो चालकानं अचानक ब्रेक दाबला. त्यानंतर कार नियंत्रणाबाहेर गेली. ५ सेकंदांत कार ७ वेळा उलटली. नियंत्रणाबाहेर गेलेली कार पाहून दुचाकीवरील दोघांनी स्वत:च्या बचावासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पलटलेली कार त्यांच्यावर कोसळली. या अपघातात बुलेरोमधील एक जण थेट बाहेर फेकला. तो १२ फूट दूर जाऊन पडला.
भीषण अपघात सीसीटीव्हीमध्य रेकॉर्ड झाला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी सकाळी ९ च्या दरम्यान हा अपघात झाला. बोलेरो कारमधील सगळे सुसारी गावाला जात होते. कार अंबाडा पेट्रोल पंपजवळ पोहोचली. त्यावेळी एक दुचाकी अचानक समोर आली. बोलेरोच्या चालकानं तातडीने ब्रेक लावला. त्यानंतर भरधाव कार नियंत्रणाबाहेर गेली आणि उलटली.
कारच्या विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकीवरील दोघांनी अपघातापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. पलटणारी येणारी त्यांच्यावर कोसळली. त्यांची प्रकृती गंभीर आहे. कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. अंतिम (२५) आणि प्रेम सिंह (१७) अशी त्यांची नावं आहेत. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींची मदत केली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.