अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकेकाळी भाजपाचे नेते असलेले शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणुकीत भाजपावर निशाणा साधत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी पत्नी पूनम सिन्हा आणि शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले असून त्यात त्यांनी स्वत:बाबत सविस्तर खुलासा केला आहे.
प्रतिज्ञापत्रानुसार शत्रुघ्न सिन्हा यांचं 14 बँकांमध्ये अकाऊंट आहे. त्यांना सोन्याचा आणि महागड्या कारचाही शौक आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम, बँक बॅलेन्स, सोने इत्यादींसह एकूण 10 कोटी, 93 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची पत्नी पूनम यांच्याकडे 10 कोटी 40 लाख रुपयांपेक्षा जास्त जंगम मालमत्ता आहे.
रिअल इस्टेटमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबई, पाटणासह अनेक शहरांमध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत, ज्याची किंमत 122 कोटी रुपये आहे. पत्नी पूनम सिन्हा यांच्याकडे 67 कोटी 16 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर 11.62 कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांच्यावर 5.93 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
आसनसोल लोकसभा जागा
टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा सध्या पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. ममता बॅनर्जी यांनी त्यांना पुन्हा एकदा या जागेवर नशीब आजमावण्याची संधी दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनीच आसनसोल जागेवर टीएमसीचे खाते उघडले होते. 2022 पूर्वी येथे टीएमसी कधीही जिंकू शकली नाही. यापूर्वी 2014-19 आणि 2019-21 मध्ये भाजपाचे बाबुल सुप्रियो येथून खासदार होते.
पक्षाच्या स्थापनेपासून, तृणमूल काँग्रेसने आसनसोल लोकसभा मतदारसंघात सहा वेळा निवडणूक लढवली आहे, परंतु कधीही जिंकली नाही. 2022 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांना विजयाची भेट दिली. शत्रुघ्न सिन्हा गेल्या तीन दशकांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षात होते. भाजपाने त्यांना दोनदा राज्यसभेवर पाठवले. शत्रुघ्न सिन्हा हे भाजपा सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही होते.