Heeraben Modi Death: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र,उपचारावेळी त्यांचे निधन झाले.हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.
मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातूनही शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते अनुपम खेर, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री कंगना रणौत, अभिनेत्री शहनाझ गिल, अभिनेता सोनू सूद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'आईला गमावण्याहून दुसरे मोठे दु:ख नाही. देव तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो', अशा शब्दात अभिनेता अक्षय कुमारने शोक व्यक्त केला.
'कठीण प्रसंगी देव पंतप्रधान मोदी यांना संयम आणि शांती देवो, ओम शांती' असे पोस्ट करत कंगनाने आदरांजली वाहिली आहे.
तर अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिले, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या माता हीराबेन यांच्या निधनाची बातमी ऐकून मन व्यथित झाले आहे. तुमचे आईसाठी असलेले प्रेम आणि आदर याची कल्पना सर्वांनाच आहे. त्यांची जागा कोणीच भरु शकणार नाही. पण तुम्ही भारतमातेचे पुत्र आहात. माझ्या आईसह प्रत्येक मातेचा तुम्हाला आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे.'
काश्मीर फाईल्स दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले, भारतमातेच्या पुत्राच्या आईचे कर्मयोगी जीवन कायमच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. नमन ओम शांती'.
कॉमेडियन कपिल शर्माने लिहिले, ' आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे हे जग सोडून जाणे खूपच दु:खद आहे. त्यांचा आशिर्वाद कायमच तुमच्या पाठीशी आहे. त्यांना स्वर्गलाभ होवो ही प्रार्थना, ओम शांती.'
'आदरणीय मोदीजी आई कुठे जात नाही, आपला मुलगा दुसऱ्यांसाठी अजून चांगले कर्म करेल यासाठी ती ईश्वरचरणी जाते. माताजी नेहमीच तुमच्यासोबत होती आणि पुढेही असेल', अशा शब्दात अभिनेता सोनू सूद यांनी शोक व्यक्त केला.
Heeraben Modi Death: हीराबेन पंचत्वात विलीन; नरेंद्र मोदींनी दिला मुखाग्नी
हीराबेन यांचा जन्म १८ जून १९२३ मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.