रुरकी: उत्तराखंडमधील रुरकी रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. हे धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी रुरकी रेल्वे स्थानक अधीक्षकांना धमकीचे पत्र मिळाले, ते अत्यंत तुटक्या हिंदीत लिहिलेले आहे. यामध्ये उत्तराखंडच्या 6 रेल्वे स्थानकांसोबतच हरिद्वारमधील मनशा देवी, चंडी देवी आणि अन्य धार्मिक स्थळांनाही बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात उत्तराखंडमधील रेल्वे स्थानकांसह प्रमुख ठिकाणी दक्षता वाढवण्यात आली आहे.
या धमकीच्या पत्राची माहिती मिळताच डेहराडून ते हरिद्वारपर्यंत दक्षता वाढवण्यात आली आहे. मात्र, यापूर्वीही त्यांना अशी धमकीची पत्रे आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रुरकी रेल्वे स्टेशन अधीक्षकांना एप्रिल 2019 मध्ये असेच धमकीचे पत्र मिळाले होते. अशा स्थितीत पोलिसांनी यापूर्वी मिळालेल्या अशा धमकीच्या पत्रांचे हस्ताक्षर जुळवताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
यासंदर्भात माहिती देताना उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, 'रुरकी रेल्वे स्टेशनच्या अधीक्षकांना 7 मे रोजी संध्याकाळी लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार अशी 6 रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. जैशचा एरिया कमांडर सलीम अन्सारीच्या नावाने धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. तरीही खबरदारी घेतली जात आहे.