नवी दिल्ली - दहशतवाद्यांकडून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात घातपात घडवण्याचा कट रचला जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'कडून कट रचला जात असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरकी पौरी येथील रेल्वे स्टेशन आणि धार्मिक स्थळांना बॉम्बस्फोट घडवून उडवण्याच्या धमकीचे पत्र हरिद्वारे रेल्वे स्टेशनचे अधीक्षकांना मिळाले. पत्रामध्ये येथील मुख्यमंत्र्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अधीक्षक कार्यालयाला 5 ऑक्टोबर रोजी हे पत्र मिळाले होते. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मौलवी अंबी सलीमच्या नावे हे पत्र पाठवण्यात आले आहे.
या पत्रात 20 ऑक्टोबरला हरिद्वार रेलवे स्टेशन, दून रेलवे स्टेशन, रुडकी, लक्सर, काठगोदाम, नैनीताल सहीत रामपूर, मुरादाबाद, बरेली, सहारनपूर, अलिगड, मेरठ, मुझफ्फरनगर इत्यादी रेल्वे स्टेशन बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय, 10 नोव्हेंबरला हरकी पौरी, उत्तराखंडातील चारही धाम आणि अन्य धार्मिक स्थळांवर घातपात घडवण्याचीही धमकी दिली आहे.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या धमकीचे पत्र मिळाल्यानंतर आयबी आणि जीआरपीसहीत हरिद्वार पोलीस प्रशासनदेखील सक्रीय झाले आहेत. येथील धार्मिक स्थळे आणि रेल्वे स्टेशन परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिळालेल्या या पत्राची सध्या चौकशी सुरू करण्यात आली असून या प्रकरणाची माहिती देशातील तपास यंत्रणा देण्यात आली आहे.