नवी दिल्ली - पश्चिम बंगालचेभाजपा खासदार अर्जुन सिंह (BJP Arjun Singh) यांच्या घराबाहेर बुधवारी सकाळी बॉम्बहल्ला घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड (Governer Jagdeep Dhankhar) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा मतदारसंघातील भाजपा खासदार अर्जुन सिंह यांच्या घरावर तीन बॉम्ब फेकण्यात आले. घरात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत असताना ही घटना घडली. राज्यपालांनी मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा हल्ला झाला, घरावर बॉम्ब फेकले तेव्हा खासदार आणि प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अर्जुन सिंह घरात उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्य यावेळी घरातच होते. राज्यपाल जगदीप धनखड यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार कमी होण्याचं नाव घेत नाही. आज सकाळी खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानाच्या बाहेर बॉम्बस्फोटाची घटना कायदाव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे. लवकरात लवकर या घटनेवर कारवाईची अपेक्षा करतो, असं धनखड यांनी म्हटलं आहे.
घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी
"मला आशा आहे की या प्रकरणी बंगाल पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाईल. त्यांच्या सुरक्षेबाबत यापूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत" असं देखील राज्यपालांनी म्हटलं आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावरुन बॉम्ब फेकणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.