कोलकाता: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्येकाँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी मतदान करण्यासाठी रांगेत उभा असलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मुर्शिदाबादमधील बलिग्राममध्ये घडली.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान मुर्शिदाबादमध्ये टीएमसी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तसेच गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली. येथील राणीनगरमधील मतदान केंद्र क्रमांक 27 आणि 28 जवळ काही अज्ञात लोकांनी गावठी बॉम्ब फेकला. यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या बॉम्ब स्फोटानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र बंद केले आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये बॉम्ब फेकतानाचे दृष्य स्पष्ट दिसत आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्येच नाही तर अन्य ठिकाणीही हिंसक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मालदामधील मतदान केंद्र क्रमांक 216 वर मतदारांना मतदान करण्यास रोखल्यामुळे मारहाण झाल्याचे समजते.
दरम्यान, मतदानाच्या तिस-या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे.
यांच्या भवितव्यावर आज मतदारांचा निर्णय...राहुल गांधी । वायनाडअमेठी या आपल्या नेहमीच्या मतदारसंघाबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातून कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे निवडणूक लढवित आहेत.जमेची बाजू : सलग दोनदा येथून कॉँग्रेसने विजय मिळविला आहे. भाजपचे येथे अस्तित्व नसल्याने भाजपने हिंदुत्ववादी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.आव्हान कोणाचे : डाव्या आघाडीचे पी. पी. सुनीर यांनी आव्हान दिले आहे. बसप, सोशल डेमॉक्रेटिक पार्टी आॅफ इंडिया, भाजपचा पाठिंबा असलेली भारत धर्म जन सेना, तसेच अन्य पक्षांचे व १४ अपक्ष उमेदवारही आहेत.
अमित शहा । गांधीनगरगुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी निवडणूक लढवित आहेत.जमेची बाजू : हा मतदारसंघ १९९६ पासून सातत्याने भाजपाच्या ताब्यात आहे. शहा हे यापूर्वी विधानसभेमध्ये सरखेज येथून निवडून आले होते. हा मतदारसंघ गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे शहा यांचा संपर्क, भाजपच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे.आव्हान कोणाचे : कॉँग्रेसचे आमदार सी. जे. चावडा मैदानात आहेत.
मुलायमसिंह यादव । मैनपुरीउत्तर प्रदेशचा मैनपुरी मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा गड आहे. यावेळी ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव हे उमेदवार आहेत. जमेची बाजू : चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही.आव्हान कोणाचे : भाजपने येथून प्रेम सिंह शाक्य यांना निवडणूक मैदानामध्ये उतरविले आहे.