सिरसा, दि. 8 - हरियाणामधील सिरसा येथील राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे. सर्च ऑपरेशनमध्ये 41 निमलष्करी, चार लष्कर जवानांच्या तुकड्या तसंच चार जिल्ह्यांची पोलीस फौज आणि एक डॉग स्क्वॉड सामील आहे. अधिका-यांनी आपल्यासोबत 10 लोहारदेखील नेले आहेत. जवानांच्या मदतीसाठी डेरा मुख्यालयाच्या बाहेर बॉम्ब स्क्वॉडदेखील तैनात आहे.
पंजाब आणि हरियाणा न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु असलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाटी सिरसा आणि आसपासच्या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. या संपुर्ण सर्च ऑपरेशनचं व्हिडीओ शूटिंग केलं जाणार आहे. इतकंच नाही तर बँकेच्या अधिका-यांची एक टीमदेखील तपास पथकात समाविष्ट आहे.
पोलिसांनी तपासणी करण्यासाठी जेसीबी मशीनदेखील आतमध्ये नेली आहे. 700 एक परिसरात पसरलेल्या राम रहीमच्या या मुख्यालयाची संपुर्ण तपासणी करायची आहे. यासाठी संपुर्ण दिवस जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, डे-यात जमिनीखाली पुरण्यात आलेली हाडे पोलीस बाहेर काढण्याची शक्यता आहे. डे-याच्या आतमध्ये मीडियाला प्रवेश नाकारण्यात आला असून, बंदी घालण्यात आली आहे. संपुर्ण तपास पुर्ण झाल्यानंतरच मीडियाला प्रवेश दिला जाणार आहे.
कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचे जवान तयार असल्याच सिरसाच्या एसपींनी सांगितलं आहे. सतनाम सिंह चौकापासून ते डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयापर्यंतचा आठ किलोमीटरचा रस्ता पुर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. सतनाम चौकात जवानांना तैनात करण्यात आलं आहे. सतनाम चौकातून डेरा सच्चा सौदा मुख्यालयात प्रवेश केला जातो. सॅटेलाईट मॅपच्या आधारे अॅक्शन प्लान तयार करण्यात आला आहे.
डेरा सच्चा सौदाच्या प्रवक्ता विपस्सना इंसा यांनी दावा केला आहे की, 'डेराने नेहमी कायद्याचं पालन केलं आहे. आम्ही आमच्या अनुयायांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आमच्याकडून कोणताही अडथळा निर्माण केला जाणार नाही'.
डेरामधील जमिनीखाली पुरले गेलेत सांगाडेडेराचं मुखपत्र 'सच कहूं'ने मान्य केलं आहे की, गुरमीत राम रहीमच्या सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या जमिनीखाली अनेक लोकांच्या अस्थी पुरण्यात आल्या आहेत. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर समोर आलेल्या आरोपांमध्ये सिरसामधील जमिनिखाली अनेक सांगाडे पुरले असल्याचं सांगण्यात आलं होतं. अनेकांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांना डेराच्या मागे असलेल्या शेतामध्ये पुरलं जायचं असा आरोप आहे. पण मुखपत्राने आरोप फेटाळत हे सांगाडे अनुयायांचे असल्याचा दावा केला आहे.