नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. आता द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्बची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही धमकी शाळेला ईमेलद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी दिल्ली पोलीस दाखल झाले असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. बॉम्ब निकामी पथकही घटनास्थळी दाखल आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. याआधी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या चाचा नेहरू रुग्णालयात बॉम्बच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची अफवा असल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयातील कर्मचाऱ्याला सकाळी १० वाजता ईमेल आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब निकामी पथक, दिल्ली अग्निशमन सेवेचे एक पथक आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने रुग्णालयात पोहोचले होते.
याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णालयामध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर ही धमकीची अफवा असल्याचे घोषित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईमेल पाठवणाऱ्याने एकाच वेळी अनेक संस्था आणि सरकारी संस्थांना एकच ईमेल पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ईमेल आयडी चुकीचे असल्याचे आढळून आले. तसेच, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि इतर एजन्सींना माहिती देण्यात आली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.